नाट्यगृहांतील तारखांचे आरक्षण आणि प्रस्तावित भाडेवाढ 

पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असून शहरामध्ये सन १९९६ मध्ये अ.भा.मराठी नाट्य परिषदेची शाखा स्थापन केली . तेव्हापासून आजतागायत गेली २७ वर्षे मी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तसेच सद्यस्थितित अ.भा.मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती संघटने चे अध्यक्ष मा. प्रशांत दामले हे अध्यक्ष असून मी उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने नाट्यगृहांच्या भाड्यात वाढ प्रस्तावित केली असून तारखांचे वाटप ऑनलाईन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जुलै २०२३ पासून याची अंमलबजावणी सुरू होईल, असे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात मी सर्व कलावंतांच्या आणि रसिकप्रेक्षकांच्या वतीने तसेच आमचे सहकारी (नाट्यनिर्माते, नाट्यव्यवस्थापक) यांचे म्हणणे या निवेदनाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडत आहे, त्याचा विचार व्हावा.

नाट्यगृहांच्या तारखांचे वाटप तथा आरक्षण ऑनलाईन पध्दतीने सुरू झाल्यास बऱ्याच अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

नाटके, बालनाट्य, गाण्यांचे कार्यक्रम, एकांकिका आदींसाठी अपेक्षित तारखा मिळणे अवघड होऊन बसेल. यात आयोजकांचे नुकसान होण्याबरोबरच रसिक प्रेक्षकांचाही हिरमोड होईल. ऑनलाईन पध्दतीने तारखांचे वाटप करू नये.

नाटकात काम करणाऱ्या सर्व कलाकारांच्या तारखा जुळून आल्यानंतर नाट्यगृहात होणाऱ्या प्रयोगांच्या तारखा निश्चित केल्या जातात.

इतरही अनेक गोष्टी त्या दिवशी जमवून आणाव्या लागतात. अशा वेळी नाट्यगृहाची तारीख न मिळाल्यास तथा मिळालेली तारीख हातातून गेल्यास अनेकांची गैरसोय होते आणि तो दिवस व्यर्थ ठरल्याने आर्थिक नुकसानही होण्याची भीती आहे.तसेच कलाकारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल.

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ती वाढ अवाजवी असू नये.

नाट्यव्यावसायिकांना, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना परवडणारे दर असावेत. नाट्प्रयोग होण्यापूर्वी तीन महिने अगोदर भाडेदर, अनामत रक्कम आदी रक्कम भरण्याचे प्रस्तावित असून ते शक्य होणार नाही. तसे होणे कठीण आहे.

नाट्यगृहांच्या तारखा आरक्षित करताना शनिवार आणि रविवारी येणाऱ्या तारखा प्राधान्याने नाटकांसाठी राखून ठेवाव्यात.

(त्याचे कारण या दोन दिवशीच नाटकांना समाधानकारक प्रेक्षक वर्ग लाभतो.) दिलेल्या तारखा काहीही कारण न देता काढून घेतल्या जातात. या प्रकारांना आळा बसावा.

नाट्यगृहांमध्ये नियुक्त केले जाणारे अधिकारी जाणकार असावेत.

किमान या क्षेत्राविषयी त्यांना पुरेशी माहिती असावी.आवश्यकता वाटल्यास यासंदर्भात नाट्यव्यावसायिक व महापालिका अशी संयुक्त बैठक घ्यावी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कायम नाट्यक्षेत्रासाठी पोषक व सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. यापुढील काळातही असेच सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा आहे, तरी सदर निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी वरील सर्व मुद्द्यांचा विचार करून च निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

×