भाजपाची उमेदवारी जाहीर; चिंचवड विधानसभेतून शहराध्यक्ष शंकर जगताप तर भोसरीतून महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर

भाजपाची उमेदवारी जाहीर; चिंचवड विधानसभेतून शहराध्यक्ष शंकर जगताप तर भोसरीतून महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर

(स्त्री शक्ती)पिंपरी राज्याच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी भारतीय जनता पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने ९९ उमेदवार जाहीर केले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अपेक्षेप्रमाणे भोसरी मतदारसंघातून महेश लांडगे यांच्याच नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांच्या ऐवजी त्यांचे दीर भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. नुकतंच अश्विनी जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत चिंचवडची उमेदवारी शंकर जगताप यांनाच द्यावी अशी मागणी देखील केली होती. त्याचप्रमाणे भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले महेश लांडगे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शंकर जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीतून कोण उमेदवार असेल हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच भोसरी विधानसभेत आमदार महेश लांडगे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला मैदानात उतरणार हे पाहणे देखील तितकेच उत्सुकतेचे ठरणार आहे.